
वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग्स पार्क, मेडिसिन डिव्हाईस पार्क, टाटा एअरबस आणि सॅफ्रन प्रकल्प एकापाठोपाठ महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर हल्ला होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने राज्यात 2 लाख कोटी रुपयांच्या एकूण 225 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात 75 हजार तरुणांना रोजगार देण्याचा संकल्प सरकारने केला आहे. त्यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये रोजगार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन संबोधित करत होते.
पीएम मोदी म्हणाले की, सरकार स्टार्टअप्स, लघु उद्योगांना आर्थिक मदत करत आहे. त्यामुळे युवकांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळत आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे दलित, आदिवासी आणि महिलांना समान प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या 8 वर्षांत 8 कोटी महिला बचत गटांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांना 5 लाख कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. या गटातील महिला इतर महिलांना रोजगार देत आहेत.
महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज देशभरात सरकारच्या माध्यमातून पायाभूत सुविधा, आयटी आणि इतर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. त्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. महाराष्ट्रात 2 लाख कोटी रुपयांच्या 225 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यातील काही प्रकल्प सुरू झाले आहेत, काही सुरू होणार आहेत. महाराष्ट्रात रस्त्यांसाठी 50 हजार कोटी रुपये, रेल्वेसाठी 75 हजार कोटी रुपये दिले आहेत. सरकार देशभरात पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. त्यामुळे लाखो रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. आगामी काळात महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.