
धुळे – चाळीसगाव रस्त्यावर धुळे जिल्ह्यातील तरवडे गावाजवळ गुरुवारी सकाळी एसटी बस उलटल्याने 20 प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथून प्रवासी घेऊन राज्य एसटी महामंडळाची बस आज सकाळी अक्कलकुवाकडे जात होती. ही बस चाळीसगावपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तरवडे गावाजवळ सकाळी साडेसात वाजता आली असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव वाहनावर धडकली. त्यामुळे बस अनियंत्रित होऊन जागीच पलटी झाली.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळ गाठले व काही वेळातच पोलीसही घटनास्थळी पोहोचले व जखमींना बसमधून बाहेर काढून धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. बसचा वेग कमी होता, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातग्रस्त बस घटनास्थळावरून हटवण्यात आली आहे.