1983 World Cup: आजच्या दिवशी भारताने जिंकला होता पहिला विश्वचषक

WhatsApp Group

आजच्या दिवशीच २५ जून १९८३ ला भारतीय क्रिकेट संघाने त्यावेळचा दिग्गज संघ वेस्ट इंडिजचा ऐतिहासिक पराभव करत पहिल्यांदा जगज्जेता होण्याचा मान पटकावला होता. या विजयाने जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटला एक नवीन ओळख मिळवून दिली. १९७५ ला चालू झालेली क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेतील पहिल्या २ विश्वकरंडक स्पर्धा या वेस्ट इंडीज संघाने जिंकल्यात. या दोन्ही स्पर्धा भारतासाठी चांगल्या गेल्या नसल्याने भारताकडे एक कमकुवत संघ म्हणून पाहिले जात होते.

१९८३ ला ९ मे ते २५ जूनपर्यंत इंग्लंडमध्ये खेळण्यात आलेल्या या स्पर्धेत अ गटात इंग्लंड, पाकिस्तान, न्युझीलंड आणि श्रीलंका हे संघ होते. तर ब गटामध्ये वेस्ट इंडीज, भारत, ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे यांचा समावेश होता. या काळात भारत आणि झिम्बाब्वेच्या संघाला अंडरडॉग्सपेक्षाही कमी महत्व दिले जायचे.

मात्र, भारताने या स्पर्धेत अविश्वसनीय कामगिरी करत सुरुवातीच्या सामन्यांमध्ये वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघावर सलग विजय मिळवला होता. १९८३ च्या विश्वकरंडक स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले होते व सर्व सामने हे ६० षटकांचे खेळवण्यात आले होते. या विश्वकरंडक स्पर्धेला प्रुडेंशियल चषक स्पर्धा’ असेही ओळखले जायचे.

१९८३ विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात विजेतेपदासाठी वेस्टइंडीज आणि भारत आमने सामने होते. एकीकडे २ वेळचा विश्वविजेता वेस्ट इंडीजचा संघ तर दुसरीकडे तुलनेत सर्वच क्षेत्रात दुबळा असलेला भारतीय संघ. अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १८३ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संघ १४० धावांवर गारद झाल्याने भारताने ४३ धावांनी विजय मिळवत पहिला-वहिला क्रिकेट विश्वकरंडक आपल्या नावावर केला.मोहिंदर आणि मदन यांनी अंतिम लढतीत प्रत्येकी ३ बळी घेत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता.