गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय कन्या आश्रम शाळेतील 106 विद्यार्थ्यांना 20 डिसेंबरला दुपारच्या जेवणातून विषबाधा झाली. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, बुधवारी धानोरा तालुक्यातील सोडे येथे जेवण केल्यानंतर विद्यार्थिनींना अचानक उलट्या आणि जुलाब होऊ लागले. त्यानंतर 73 विद्यार्थिनींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर इतर मुलींवर गावच्या रुग्णालयातच उपचार सुरू आहेत.
विद्यार्थिनींना दुपारी 12 वाजता कोबी, वरण भात असा मेन्यू होता, सोबत गाजरी खाण्यासाठी दिले होते. जेवण खाल्ल्यानंतर काही वेळाने काही विद्यार्थिनींना उलट्या होऊ लागल्या. त्यांना रुग्णालयात नेले असता इतर विद्यार्थिनींनाही जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या. यानंतर 12 रुग्णवाहिकेतून सर्वांना रुग्णालयात आणण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने शाळेला भेट देऊन विद्यार्थिनींची विचारपूस केली.
विद्यार्थिनी आजारी पडल्यावर जेवणाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विभागीय आणि प्रकल्प अधिकाऱ्यांनी रुग्णालयातील विद्यार्थिनींची भेट घेतली. याशिवाय अन्न प्रशासन विभागाने अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.