
भाईंदर येथील अरबी समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमाराच्या जाळ्यात सुमारे 100 वर्ष जुने कासव अडकले, त्याला मच्छिमाराने पुन्हा समुद्रात सोडले. उत्तन भाटेबंदर संकुलातील जोसेफ हा मच्छीमार ‘जाजक’ नावाच्या बोटीने अरबी समुद्रात मासेमारीसाठी गेला होता.
जोसेफने सांगितले की, जेव्हा त्याने मासे पकडण्यासाठी समुद्रात जाळे टाकले तेव्हा त्याच्या लक्षात आले की एक मोठा प्राणी त्यात अडकला आहे. मच्छीमारांनी जाळे ओढून बोटीवर आणले असता, त्यात सुमारे 100 वर्षे जुने कासवांची दुर्मिळ प्रजाती दिसली. त्याची लांबी सुमारे 8 ते 10 फूट होती. हे कासव इतकं जड होतं की बोटीवरील 18 जणांना ते समुद्रातून खेचून सोडण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला.
समुद्रातून मासे सोडून इतर कोणताही प्राणी पकडण्यास सरकारने बंदी घातल्याने त्या कासवाचे व्हिडिओ शूट करून पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. सुमारे 5 दिवसांच्या सागरी प्रवासानंतर जोसेफने सर्वांना याची माहिती दिली. जोसेफच्या म्हणण्यानुसार, कासव जाळ्यात अडकल्याने जाळ्याचे नुकसान झाले, त्यामुळे त्यांना मासे न पकडता किनाऱ्यावर परतावे लागले. त्यामुळे त्यांचा डिझेलचा खर्च व्यर्थ गेला व आर्थिक नुकसानही झाले.