
नांदगांव तालुक्यातील (Nanadgaon Taluka) आमोदे येथील शिवारामध्ये दहा मोर (Peacock) मृतावस्थेत आढळून आले आहेत. या घटनेमुळे वन विभागात (Forest Department) खळबळ उडाली आहे. वन विभागाने या दहाही मोरांच्या मृत्यूची (Death) नोंद घेतली असून, विषबाधेमुळे या मोरांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
नांदगावपासून तालुक्यातील आमोदे शिवारातील येथील गिरणा आणि मन्याड नदीच्या परिसरात ही घटना घडली आहे. दिपक पगार हे शेतात जात असताना विठ्ठल लाला पगार यांच्या शेतात काही मोर शेतात तडफडत असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने वनविभागाला या बाबत माहिती दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली असता जवळपास दहा मोर मृत्यु मुखी पडल्याचे आढळुन आले.
सदर मोरांचा मृत्यू हा विषबाधाने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. वन विभागाचे आरएफओ चंद्रकांत कासार, वनरक्षक सुरेंद्र शिरसाठ, एन के राठोड, आर के दौंड, वनपाल सुनील महाले, वनमजुर विकास बोडखे आदींनी घटनेचा पंचनामा केला. याबाबत पुढील तपास नांदगांव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कासार हे करत आहेत.