अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयाला आग, 10 कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू

WhatsApp Group

अहमदनगर – महाराष्ट्रातील अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 10 कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी या घटनेची माहिती दिली आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही शोक व्यक्त केला आहे.

अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कोविड-19 वर उपचार घेत असलेल्या भागात ही आग लागली होती. या अपघातात 10 कोरोना रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जखमी रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आग विझवल्यानंतर ही आग किती भीषण होती हे कोरोना वॉर्डातील दृश्ये पाहिल्यानंतरच कळते. आगीमुळे कोरोना वॉर्डातील बेड, औषधे, वैद्यकीय उपकरणे यांचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एसीमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना वॉर्डमध्ये 25 जण दाखल होते, त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 6 जण भाजले आहेत.

 

महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले की, ही आग हॉस्पिटलच्या नव्याने बांधलेल्या आयसीयू वॉर्डमध्ये लागली आहे. या आयसीयू वॉर्डमध्ये कोरोनाचे रुग्ण होते. ही घटना गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयांना स्वत:हून फायर सेफ्टी ऑडिट करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आता या रुग्णालयाचे फायर सेफ्टी ऑडिट झाले की नाही, याची चौकशी केली जाईल. हॉस्पिटलचे ऑडिट झाले नाही तर ही गंभीर घटना आहे.

ऑडिट करूनही आग लागली असेल तर त्याची चौकशी केली जाईल, असे नवाब मलिक यांनी सांगितले. तपासात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाई जाहीर केली जाईल, असेही ते म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी या घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, असंही म्हटलं आहे.