पालघरमध्ये धक्कादायक घटना; 10 महिन्यांच्या चिमुरडीला कॅबमधून फेकले, आईचा विनयभंग

WhatsApp Group

महाराष्ट्रातील पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एका महिलेचा कॅबमध्ये विनयभंग करण्यात आला असून तिच्या मुलीलाही चालत्या कारमधून फेकून देण्यात आले आहे. 10 महिन्यांच्या मुलीला कॅबमधून फेकण्यात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर तिच्या आईलाही विनयभंगानंतर बाहेर फेकण्यात आले. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिलेलाही वाहनातून बाहेर ढकलण्यात आले आणि ती गंभीर जखमी झाली. महिला आणि तिची मुलगी पेल्हारहून वाडा तहसीलमधील पोशेरे येथे कॅबमधून परतत असताना ही घटना घडली.

महिलेने पोलिसांना सांगितले की तिने शेअरिंग कॅब बुक केली होती आणि वाटेत कॅब चालक आणि काही सहप्रवाशांनी तिचा विनयभंग केला. महिलेने विरोध केल्यावर त्यांनी मुलीला हिसकावले आणि भरधाव वेगाने येणाऱ्या कॅबमधून बाहेर फेकले.

पोलिसांनी सांगितले की, महिलेला गंभीर दुखापत झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मांडवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी विजय कुशवाहाविरुद्ध आयपीसी कलम 304 आणि 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.