
औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा आज 54 वा वाढदिवस आहे. अशातच राज्यभरातील तमाम मनसैनिकांनी राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दुसरीकडे राज यांच्या 54 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 54 रुपये लिटरने पेट्रोल देण्याचा निर्णय औरंगाबादेतील (Aurangabad) मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. औरंगाबादमधील मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
सकाळी 8 ते 9 वाजेच्या दरम्यान शहरातील क्रांती चौका पेट्रोल पंपावर प्रत्येकी 1 लिटर पेट्रोल 54 रुपये लिटरने दिले जाणार असं खांबेकर यांनी सांगितलं आहे. त्यामुळे कमी किमतीत पेट्रोल घेण्यासाठी नागरिकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली आहे. मागील वर्षभरापासून पेट्रोल डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.
1 लिटर पेट्रोल घेण्यासाठी वाहनधारकांना जवळपास 115 रुपये मोजावे लागत आहे. अशातच राज यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेने कमी दरात पेट्रोल देऊन नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले आहे.