पर्यटन विभागाचे आता एकच बोधचिन्ह व घोषवाक्य – पर्यटन मंत्री गिरीश महाजन

WhatsApp Group

मुंबई : पर्यटन संचालनालय तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या दोन  प्रमुख संस्था पर्यटन विभागाच्या अधिनस्त असल्या तरी त्यांचे बोधचिन्ह, घोषवाक्य यामध्ये तफावत होती, ती आता दूर करण्यात आली आहे. आता ‘महाराष्ट्र टुरिझम’ हे बोधचिन्ह (लोगो), ‘महाराष्ट्र अनलिमिटेड’ हे घोषवाक्य (टॅग लाईन) असेल, असा निर्णय घेण्यात आल्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

पर्यटन विभागाच्या अंतर्गत असलेल्या पर्यटन संचालनालय तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यामार्फत वापरण्यात येणारे बोधचिन्ह (लोगो) तसेच घोषवाक्य हे स्वतंत्र वेगळ्या स्वरूपातील होते. मात्र आता पर्यटन विभागाला एकच घोषवाक्य असणार आहे.

राज्यातील पर्यटन स्थळांची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी, प्रचार करून  पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी शासन कार्यरत आहे. देशातील एक अग्रगण्य राज्य बनवून मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आकर्षित करण्याकरता नुकतेच ‘पर्यटन धोरण 2024’ राज्यात जारी करण्यात आले आहे. येत्या काळामध्ये राज्यातील पर्यटन वाढीसाठी महत्त्वपूर्ण योजना आणि उपक्रम या धोरणाअंतर्गत राबविण्यात येणार आहेत असेही  मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.