बुरहानपूर जिल्ह्यात घरगुती वादातून एका 30 वर्षीय महिलेने रविवारी आपल्या चार अल्पवयीन मुलांसह विहिरीत उडी मारली. या घटनेत तीन मुलांचा मृत्यू झाला आहे, तर आई आणि एक मुलगी बचावली आहे. बुरहानपूरचे पोलीस अधीक्षक राहुल कुमार यांनी सांगितले की, जिल्ह्यातील खकनार भागातील बालदी गावात ही घटना घडली. त्यांनी सांगितले की, घरगुती भांडणानंतर प्रमिला भिलाला यांनी प्रथम चार मुलांना घराजवळील विहिरीत फेकले आणि नंतर स्वत: उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत तीन मुलांचा मृत्यू झाला.
पतीसोबत झालेल्या वादातून विहिरीत उडी मारली
हे प्रकरण जिल्ह्यातील खाकनार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिकबर्डी फलिया गावातील आहे. प्रमिलाचा पतीसोबत काही कारणावरून किरकोळ वाद झाला. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रमेशने पत्नीला महुआला शेतात घेऊन जाण्यास सांगितले होते, मात्र यावरून दोघांमध्ये वाद झाला. गावकऱ्यांनी सांगितले की, दुपारी 4 ते 5 च्या दरम्यान एका महिलेने तिच्या 4 मुलांसह खोल विहिरीत उडी घेतली. यामध्ये 3 निष्पाप मुलांचा बुडून मृत्यू झाला. तर 7 वर्षीय मुलगी आणि आई विहिरीतून कशीतरी बाहेर आली.
ग्रामस्थांच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. तीन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले, तर महिला आणि मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृतांमध्ये दीड वर्षाचा मुलगा आणि 3 आणि 5 वर्षांच्या दोन मुलींचा समावेश आहे. विहिरीत उडी मारताना घाबरलेल्या महिलेने दोरीच्या साहाय्याने बाहेर पडून आपल्या 7 वर्षांच्या मोठ्या मुलीलाही वाचवण्यात यश मिळविले.