
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात येत आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ५०० रुपयांची नोट चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही, तर या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की लवकरच ९० टक्के एटीएममध्ये केवळ १०० आणि २०० रुपयांच्या नोटाच उपलब्ध असतील.
व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये एक स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला आहे. यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की RBI ने सर्व बँकांना त्यांच्या एटीएममध्ये केवळ लहान मूल्याच्या नोटांचाच साठा ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून अनेकांनी ५०० रुपयांच्या नोटांबाबत चिंता व्यक्त केली आहे.
Bye Bye 500 rupees currency notes
75% ATMs Dispense Rs 100 And Rs 200 Notes By September, 90% By March Next Year: RBI To Banks
— Woke Eminent (@WokePandemic) April 29, 2025
RBI च्या सूचनांचे वस्तुस्थितीशी मिळतेजुळते काय आहे?
पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की RBI ने खरंच एक परिपत्रक जारी केले आहे. मात्र, त्या परिपत्रकात ५०० रुपयांची नोट बंद करण्याबाबत कुठलाही उल्लेख केलेला नाही. रिझर्व्ह बँकेने केवळ बँकांना त्यांच्या एटीएममध्ये १०० आणि २०० रुपयांच्या नोटांची उपलब्धता वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
या निर्देशामागचे RBI चे उद्दिष्ट काय आहे?
आरबीआयचा उद्देश स्पष्ट आहे – सामान्य नागरिकांना लहान नोटा सहज मिळाव्यात. अनेकदा ५०० किंवा २००० रुपयांच्या नोटा तुटण्यासाठी दुकानदारांकडे सुटे पैसे नसतात. परिणामी ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. लहान मूल्याच्या नोटा एटीएममधून मिळाल्यास दैनंदिन व्यवहार अधिक सोपे होतील, यासाठी RBI ने हे पाऊल उचलले आहे.
तर मग ५०० रुपयांची नोट बंद होणार आहे का?
रिझर्व्ह बँकेने ५०० रुपयांची नोट बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, आणि अशा प्रकारचे कुठलेही संकेतही दिलेले नाहीत. सोशल मीडियावर फिरत असलेली माहिती पूर्णपणे खोटी आहे. RBI च्या अधिकृत परिपत्रकात केवळ लहान मूल्याच्या नोटांचा पुरवठा वाढवण्याची सूचना आहे.
अफवांपासून सावध राहा
सामान्य जनतेने अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही अधिकृत माहिती फक्त RBI च्या वेबसाइट किंवा मान्यताप्राप्त माध्यमांतूनच घ्या. ५०० रुपयांची नोट पूर्वीप्रमाणेच वैध आहे आणि ती वापरण्यात कुठलीही अडचण नाही.