Video: नेपाळच्या फलंदाजाने रचला इतिहास, 6 चेंडूंवर सलग 6 षटकार ठोकत युवराज सिंगच्या विक्रमाची केली बरोबरी
Dipendra Singh Airee: नेपाळचा फलंदाज दीपेंद्र सिंग ऐरी याने कतारविरुद्ध 6 चेंडूत सलग 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला. या फलंदाजाने सलग 6 चेंडूत 6 षटकार ठोकले. भारताच्या युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्यांदा 6 चेंडूत सलग 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला होता. भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगने 2007 च्या ती-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध स्टुअर्ट ब्रॉडच्या 1 षटकात सलग 6 षटकार ठोकले होते. त्याचवेळी आता नेपाळी क्रिकेटपटू दीपेंद्र सिंग ऐरीने ही कामगिरी केली आहे.
दीपेंद्र सिंग ऐरीने कतारविरुद्ध खेळली तुफानी खेळी…
कतारविरुद्ध दीपेंद्र सिंग ऐरीने 21 चेंडूंत नाबाद 64 धावा केल्या. त्याने आपल्या झंझावाती खेळीत 7 षटकार आणि 3 चौकार लगावले. त्याचबरोबर दीपेंद्र सिंग ऐरी हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय सामन्यात सलग 6 षटकार मारण्याव्यतिरिक्त 1 बळीही घेण्याचा पराक्रम केला आहे. आजपर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूला आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अशी कामगिरी करता आली नव्हती. दीपेंद्र सिंग ऐरीच्या झंझावाती खेळीमुळे नेपाळने 20 षटकांत 7 गडी गमावून 210 धावा केल्या. दीपेंद्र सिंग ऐरीशिवाय आसिफ शेखने 41 चेंडूत 52 धावा केल्या.
दीपेंद्र सिंग ऐरी याची कारकीर्द
दीपेंद्र सिंग ऐरीच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर या खेळाडूने आतापर्यंत 55 एकदिवसीय सामने आणि 57 टी-20 सामन्यांमध्ये नेपाळचे प्रतिनिधित्व केले आहे. दीपेंद्र सिंग ऐरीने टी-20 सामन्यांमध्ये 149.64 च्या स्ट्राइक रेटने आणि 38.79 च्या सरासरीने 1474 धावा केल्या आहेत. याशिवाय वनडे फॉरमॅटमध्ये दीपेंद्र सिंग ऐरीच्या नावावर 19.06 च्या सरासरीने आणि 71.22 च्या स्ट्राईक रेटने 896 धावा आहेत. याशिवाय दीपेंद्र सिंग अरी हा गोलंदाज म्हणूनही खूप यशस्वी ठरला आहे. या खेळाडूने एकदिवसीय सामन्यांमध्ये 3.91 आणि 33.39 च्या सरासरीने 38फलंदाजांना बाद केले आहे. तर टी-20 फॉरमॅटमध्ये त्याने 6.06 च्या इकॉनॉमी आणि 18.75 च्या सरासरीने 32 फलंदाजांना आपले बळी बनवले.
DIPENDRA SINGH AIREE BECOMES THE THIRD PLAYER TO HIT 6 SIXES IN AN OVER IN T20I HISTORY ⭐🔥 pic.twitter.com/UtxyydP7B0
— Johns. (@CricCrazyJohns) April 13, 2024
नेपाळसाठी 1,500 धावा करणारा दीपेंद्र पहिला फलंदाज
दीपेंद्रने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 1500 धावा पूर्ण केल्या. हा आकडा करणारा तो पहिला नेपाळी फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत 60 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 39.00 च्या सरासरीने आणि 146.89 च्या स्ट्राइक रेटने 1,560 धावा केल्या आहेत. दरम्यान, त्याने 1 शतक आणि 9 अर्धशतकांसह सर्वाधिक नाबाद 110 धावा केल्या आहेत. त्याने 119 चौकार आणि 65 षटकारही मारले आहेत.
सलग 6 षटकार मारणारा तिसरा फलंदाज
टी-20 इंटरनॅशनलमध्ये पहिल्यांदा युवराज सिंगने 2007 मध्ये इंग्लंडविरुद्ध स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात सलग 6 षटकार ठोकले होते. यानंतर 2021 मध्ये वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार किरॉन पोलार्डने श्रीलंकेविरुद्ध असाच पराक्रम केला होता. आता नेपाळच्या दीपेंद्र सिंगने कतारकडून खेळताना षटकात 6 षटकार ठोकले आहेत.