भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर Wasim Jaffer आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1978 रोजी मुंबईत झाला. वसीम जाफरने टीम इंडियासाठी 31 कसोटी आणि 2 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने 2000 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2006 मध्ये त्याने पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. त्याने कसोटी सामन्यांच्या 58 डावांमध्ये 5 शतके आणि 11 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 1944 धावा केल्या तर एकदिवसीय सामन्यांच्या दोन डावात फक्त 10 धावा केल्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रेकॉर्ड्सचा विचार केला तर महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा उल्लेख नक्कीच होतो. त्याचप्रमाणे भारतीय देशांतर्गत क्रिकेट वसीम जाफरशिवाय अपूर्ण आहे. जाफरच्या नावावर अनेक मोठे रेकॉर्ड्स आहेत, ज्यामुळे त्याला देशांतर्गत क्रिकेटचा ‘सचिन’ म्हटले जाते. तो 10 रणजी करंडक विजेते संघांचा भाग आहे. जाफर मुंबई संघात असताना (1996-97 ते 2012-13) या काळात मुंबईने आठ वेळा रणजी ट्रॉफी जिंकली होती, परंतु नंतर तरुणांना संधी देण्यासाठी विदर्भाच्या संघात सामील होण्यासाठी त्याने मुंबई सोडली. त्यानंतर त्याने विदर्भाला दोनदा (2018 आणि 2019) रणजी करंडक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
╔╗╔╦══╦═╦═╦╗╔╗
║╚╝║══║═║═║╚╝║
║╔╗║╔╗║╔╣╔╩╗╔╝
╚╝╚╩╝╚╩╝╚╝• B-day • #Wasimjaffer pic.twitter.com/GcfGvbtH1Z— JAYESH RABARI (@JAYESHDEWASI07) February 16, 2022
वसीम जाफरने 1996-97 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आपल्या कारकिर्दीतील दुसऱ्या प्रथम श्रेणी सामन्यात त्रिशतक झळकावून भारतीय कसोटी संघात स्थान मिळवले. आंतरराष्ट्रीय स्तरावर नाही, पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने सातत्यपूर्ण छाप पाडली. जाफरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 260 सामने खेळले आणि 19410 धावा केल्या. यादरम्यान त्याने 57 शतके आणि 91 अर्धशतके झळकावली. त्याचबरोबर त्याने 150 रणजी सामने खेळले आणि 12 हजारांहून अधिक धावा केल्या, ही मोठी उपलब्धी आहे. रणजी ट्रॉफीमध्ये 12,000 धावा करणारा तो पहिला फलंदाज आहे तसचे रणजी ट्रॉफीमध्ये 150 सामने खेळणारा तो पहिलाच फलंदाज आहे.