उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये काल रात्री भीषण स्फोट झाला. फटाके बनवणाऱ्या कारखान्यात हा स्फोट झाला. हा कारखाना नौशेहरा गावात एका घरात बांधण्यात आला होता. या दुर्घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला असून 5 हून अधिक लोक गंभीररीत्या भाजलेत.
स्फोटाचा आवाज 15 किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटामुळे आजूबाजूची अनेक घरेही कोसळली. एसएसपी सौरभ दीक्षित यांनी अपघाताला दुजोरा दिला. पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठून जेसीबीच्या सहाय्याने ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारखान्याचा मालक फरार असून कारखाना बेकायदेशीरपणे चालवत होता.
अग्निशमन दल उशिरा पोहोचल्याने नागरिक संतप्त
आग्रा रेंजचे आयजी दीपक कुमार यांनी सांगितले की, शिकोहाबाद पीएस भागातील एका घरात फटाके बनवले जात होते आणि दुसऱ्या घरात एक गोदाम बनवले होते, तिथे अचानक स्फोट झाला. स्फोटामुळे एका घराचे छत कोसळले. ज्या घरात स्फोट झाला ते घर जळून खाक झाले. छत कोसळल्यामुळे जवळपास 10 लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले, ज्यांना बचावकार्यात वाचवण्यात यश आले, मात्र तोपर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला होता. गोदामाच्या चौकीदाराची पत्नी मीरा देवी, 20 वर्षांचा मुलगा अमन, 18 वर्षांचा मुलगा गौतम आणि 3 वर्षांची मुलगी इच्छा अशी मृतांची नावे आहेत. मदत मिळण्यास उशीर झाल्यामुळे घटनास्थळी उपस्थित नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली.