राज्यात थांबलेल्या पायाभूत सुविधांचे प्रकल्पांना आम्ही गती दिली, महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर अग्रेसर: एकनाथ शिंदे
मुंबई : ‘महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर अग्रेसर आहे. राज्यात पायाभूत सुविधांचे प्रकल्प थांबले होते. या प्रकल्पांच्या कामांना आम्ही गती दिली आहे. हे प्रकल्प जनतेच्या सेवेत वेळेत दाखल व्हावेत, असा आमचा निर्धार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. दूरदर्शनच्या डीडी-न्यूज वाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.
‘महाराष्ट्रात आता केंद्राकडून राज्याला मिळणारा निधीचा ओघ सुरु झाला आहे. प्रकल्पांमध्ये कुठल्याही प्रकारची कपात न करता, भरीव निधी मिळतो आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचे राज्याच्या विकासाला पाठबळ लाभत असल्याचा, पुनरूच्चार देखील मुख्यमंत्र्यांनी या मुलाखती दरम्यान केला.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांच्या बाबतीत देशात क्रमांक एकचे राज्य आहे. मेट्रो सात-२-ए मार्गिका, मेट्रो-३, आरे कार शेड, बुलेट ट्रेन, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या प्रकल्पांचे काम मार्गी लागले आहेत. लोकांच्या हितांचे हे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, असा आमचा प्रयत्न आहे. प्रकल्प थांबल्याने, त्यांच्या खर्चात वाढ होते. त्याचा भार सामान्य नागरिकांवरच येतो. शिवाय त्यांचा वेळही वाया जातो. सुविधाही मिळत नाही. त्यामुळे प्रकल्प गतीने पूर्ण व्हावेत याकडे आमचा कटाक्ष आहे. यातील काही प्रकल्प हे गेम चेंजर असल्याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून केला.
शिवडी-न्हावाशेवा ते मुंबई हा प्रकल्प हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या प्रकल्पाला मुंबईतील वरळी येथे सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्पाला जोडले जाणार आहे. यामुळे मुंबईतून- नवी मुंबईला अवघ्या काही मिनिटांत पोहोचता येणार आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळेही अंतर कमी होणार आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे वेळेची, इंधनाची बचत होणार आहे. प्रदूषण कमी होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे शेतीमाल देखील महानगरात कमी वेळेत पाठवता येणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीत दिली.
समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम केले. त्यासाठी रस्त्यावर उतरून काम केले. त्यांच्यापर्यंत पोहोचून, विक्रमी वेळेत भूसंपादनाच्या मोबदल्याची रक्कम संबंधितांच्या खात्यात जमा केली. त्यामुळे या प्रकल्पाला असलेला विरोध मावळला, आणि विश्वास निर्माण झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
‘मी रस्त्यावर उतरून काम करणारा कार्यकर्ता आहे. लोकांना त्रास होऊ नये. किंवा असा त्रास होण्यापूर्वीच त्याचे निराकारण व्हावे यावर माझा भर असतो,’ असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुंबईतील नाले- सफाईच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी तसेच रस्ते खड्डे-मुक्त करण्याच्या भूमिका याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, मुंबई हे शहर आंतरराष्ट्रीय लौकीक असलेले शहर आहे. देशाची आर्थिक राजधानी आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची मुख्यालये मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबई खड्डेमुक्त व्हायलाच हवी, असा आमचा निर्धार आहे. त्यासाठी मी आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना स्पष्ट निर्देश दिले. पहिल्याच टप्प्यात ४५० किलोमीटरचे रस्ते काँक्रिटीकरणाचा निर्णय घेतला. आगामी एक दोन वर्षात पूर्ण मुंबई शहरातील रस्ते खड्डेमुक्त होतील, असे प्रयत्न आहेत, असेही त्यांनी सांगितले.